पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नावाने पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट ‘एसएमएस’ पाठवण्याचे प्रकार शहरामध्ये घडत आहेत. नागरिकांनी अशा बनावट ‘एसएमएस’कडे दुर्लक्ष करावे. बनावट ‘एसएमएस’ पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.महापालिका कार्यक्षेत्रात सध्या ज्या मालमत्तेची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून ‘एसएमएस’द्वारे व इतर माध्यमातून करण्यात येत असते; परंतु सध्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाइल क्रमांकांवरून बनावट ‘एसएमएस’ पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा ‘एसएमएस’कडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बनावट ‘एसएमएस’बाबत नजीकचे पोलिस ठाणे, सायबर पोलिस ठाणे किंवा १९०३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे...असा आहे बनावट ‘एसएमएस’शहरातील नागरिकांना पाठवण्यात येणारे बनावट ‘एसएमएस’ देवेश जोशी या नावाने आहेत. ‘प्रिय ग्राहक, मागील महिन्यातील बिल न भरल्यामुळे रात्री ९ वाजता पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कृपया याबाबत तत्काळ खालील नंबरवर कॉल करा,’ असे या ‘एसएमएस’मध्ये नमूद केले आहे.‘APK फाइल डाऊनलोड करू नका’व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात येणाऱ्या ‘एसएमएस’मध्ये एक एपीके (APK) फाइल पाठवली जात आहे. ही एपीके फाइल डाऊनलोड केल्यानंतर मोबाइल फोनमधील डेटा, बँक खात्याची माहिती, पासवर्ड अशा स्वरूपाची माहिती मिळवून बँक खात्यातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत.
पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित बिलासंंबंधी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून माहिती घ्यावी. फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहावे. असा प्रकार घडल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. - संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नावाने बनावट ‘एसएमएस’ वारंवार विविध क्रमांकांवरून नागरिकांना पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या ‘एसएमएस’कडे दुर्लक्ष करावे. त्यामध्ये नमूद क्रमांकावर संपर्क करू नये. बनावट ‘एसएमएस’मधील एपीके फाइल डाऊनलोड करू नये. बनावट ‘एसएमएस’ पाठवणाऱ्यांबाबत महापालिकेकडून सायबर पोलिसांना माहिती देणार आहे. - शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका