पिंपरी : भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत. यामुळे या इमारती लवकरच खचण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनाला लागून राहिली आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करता येत नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ची पुनरावृत्ती झाली तर दोष कुणाला द्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने १९८७ मध्ये भाटनगर येथे पहिला बहुमजली पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर येथे १७ इमारती उभारण्यात आल्या. या प्रकल्पाचे त्या वेळी मोठे कौतुकही झाले होते. तथापि, सद्य:स्थितीमध्ये या सर्व इमारतींची दुरवस्था झाली आहे़पुनर्वसन प्रकल्पातील इमारती ३० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. जिणे नादुरुस्त झाले आहेत. त्यावरून चढउतार करतेवेळी अपघात होत असतात. पावसाळ्यात तर चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये छतातून पाणी गळते. ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वड, पिंपळासारखी झाडे उगवली आहेत. इमारतीच्या बहुतांश भिंती शेवाळलेल्या असल्याने कमकुवत बनल्या आहेत. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यामध्ये आळ्यांची बजबज पहायला मिळत आहे. भटक्या जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या समस्यांविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन एक-एक दिवस कंठत असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. विजेचे मीटर गायब झाले असून बाहेरील खांबावरून घेण्यात आलेल्या वीज जोडणीमुळे इमारतीमध्ये धोकादायक विजेचे जाळे निर्माण झाले आहे. इमारत कोसळण्याच्या भीतीबरोबरच धोकादायक वीजतारांमुळेदेखील मोठी दुर्घटना होऊ शकते. भाटनगर प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
भाटनगर वसाहतही धोक्याच्या छायेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:22 AM