पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे याला पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या एका पथकाने शनिवारी (दि.८) पहाटे नाशिकजवळून ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार होता. अखेर त्याला नाशिक येथून सापळा रचून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांनी एकत्रित येत तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती ही स्थानिक राजकीय आघाडी स्थापन केली होती. त्या माध्यमातून खळदे यांच्या पत्नी हेमलता खळदे या नगरसेवक पदावरही निवडून आल्या होत्या, तर जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक ही निवडून आले होते. त्यानंतर खळदे आणि आवारे यांच्यात वैचारिक मतभेद होऊन दोघेही वेगळे झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये खळदे याने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये वृक्षतोडीच्या प्रकरणातील वादावरून किशोर आवारे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचा राग मनात धरून खळदे याने आवरे यांच्या खुनाची सुपारी दिली, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली.
किशोर आवारे खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक केलेली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या गौरव खळदे याच्या तपासात त्याच्या वडिलांचाही या खून प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भानू खळदे याचा शोध सुरू केला. मात्र मागील दीड महिन्यापासून तो फरार होता. अखेर खळदे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.