हिंजवडी : चार दिवसांपूर्वी पुण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या पीएफआय संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात हिंजवडीत शिवसेने आक्रमक होत आंदोलन केले. सोमवारी (दि.२६) सकाळी हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंजवडी परिसरातील शिवसैनिक एकत्र जमले होते.
यावेळी पाकिस्तान प्रेमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. हिंजवडीतील मुख्य चौकात शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी देखील अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलना दरम्यान युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नागेश साखरे यांनी खास शैलीत उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करत, तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरमच्या जय घोषाने परिसर दणानून गेला होता. आंदोलनात मुळशी तालुका संघटक सूर्यकांत साखरे, शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नागेश साखरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याच्या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआय संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यानी "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या होत्या त्याचा निषेध म्हणून हिंजवडीत (ता. मुळशी) शिवसेनेने आक्रमक होत आंदोलन केले.