भोसरी : भोसरी ते दिघी या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते.मात्र, हा रस्ता केवळ निवडणुकीपुरता होणे अपेक्षित नाही, तर त्याचे डांबरीकरण करून कायमस्वरूपी नागरिकांना तो वापरता येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केले. प्रभाग क्रमांक ५ मधील गवळीनगर येथील कोपरा सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतनाना लोंढे, कोमलताई फुगे व अनुराधाताई गोफणे उपस्थित होते. अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘भोसरीतून दिघीला जाण्यासाठी सावंतनगर येथील हा रस्ता नागरिकांसाठी सोयिस्कर आहे. म्हणून आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. महापालिका आयुक्तांनी कलम २०५ नुसार भोसरी ते दिघी हा जोडरस्ता घोषित केला होता. मात्र, काही नागरिकांनी हरकत घेतल्यामुळे हा प्रश्न न्यायालयात गेला. त्यामुळे हा रस्ता होऊ शकला नाही. आता हा प्रश्न न्यायप्रविष्ट असला, तरी काही जणांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या रस्त्याची मुरुम टाकून डागडुजी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याची दुरुस्ती केली असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. म्हणूनच वरवरची मलमपट्टी न करता या रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांची कायमस्वरूपी सोय होणे अत्यंत आवश्यक आहे.वसंतनाना लोंढे म्हणाले, सावंतनगर येथे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. लोकांच्या गरजा ओळखून विकासकामे केली आहेत. त्याचा फायदा लोकांना होत आहे. यापुढेही येथील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या वेळी कोमलताई फुगे, अनुराधाताई गोफणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस गवळीनगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
भोसरी-दिघी रस्ता कायमस्वरूपी व्हावा
By admin | Published: February 15, 2017 2:05 AM