पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील शीतलबाग आणि नाशिक फाटा येथे उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाची चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. भोसरी आणि नाशिक फाटा या दोन्ही ठिकाणच्या पादचारी पुलापेक्षाही अधिक चांगला दर्जा आणि जास्त लांबीचा पूल खडकी रेल्वेस्थानकाजवळ उभारला आहे. त्यासाठी अवघे पावणेदोन कोटी रुपये खर्च झाल्याचे जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची एका मागून एक प्रकरणे उघडकीस येत आहेत. या विषयी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार जगताप म्हणाले, ‘‘भोसरी येथील शीतलबाग येथे उड्डाणपूल संपल्यानंतर असणाऱ्या तीव्र उताराजवळ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आॅनलाइन पद्धतीने निविदा मागविल्या. या पादचारी पुलासाठी सुरुवातीला ७१ लाख ५ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, बांधकाम साहित्यात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत सुरुवातीला हा खर्च अडीच कोटींवर, त्यानंतर या पुलाच्या खर्चात वाढ तब्बल आठपट वाढ करून तो साडेपाच कोटींवर नेला आहे. या पादचारी पुलासाठी एका सपोर्ट कॉलमऐवजी दोन सपोर्ट कॉलम उभे करण्याच्या नावाखाली खर्चात आणखी दोन कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट साडेसात कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नाशिक फाटा येथे पुणे-मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी तब्बल साडेदहा कोटी रुपये खर्च येणार आहेत. खडकीत पुणे-मुंबई महामार्ग आणि रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी हा पादचारी पूल उभारला आहे. इतक्या सुविधा असूनही या पादचारी पुलाच्या उभारणीसाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. त्या तुलनेत शीतलबाग येथे उभारण्यात येणारा पादचारी पूल हा केवळ पुणे-नाशिकमहामार्ग आणि नाशिक फाटा येथील पादचारी पूल पुणे-मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी उभारण्यात येत आहे.’’ (प्रतिनिधी)
भोसरी, नाशिक फाटा पुलाच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: September 12, 2016 2:05 AM