पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. दोन वेळा भोसरी मतदारसंघाचे आमदार असलेले महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांना मैदानात उतरवले आहे. लांडगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व विश्वासू मानले जातात, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी गव्हाणे यांना पक्षात दाखल करून घेत तिकीट दिले. या दोन्ही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ मध्ये भोसरीतून विलास लांडे अपक्ष निवडून आले. त्यानंतर २०१४ ला राष्ट्रवादीमधून बंड करत नगरसेवक असलेल्या महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. लांडगे यांनी २०१९ मध्ये विलास लांडे यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक लढवत बाजी मारली. आता ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार विलास लांडे यांचे शिष्य असलेले महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गव्हाणे रिंगणात आहेत.
गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर लांडगे निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात कोणतीही विकासकामे झाली नसल्याचा दावा करत गव्हाणे यांच्याकडून वातावरण तापवले जात आहे. महापालिकेत समाविष्ट गावांत तयार करण्यात आलेले रस्त्यांचे जाळे, कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प, जगातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवन यांसारख्या विकासकामांचा पाढा भाजपकडून वाचला जात आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, नव्याने होणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांमध्ये सुरू असलेले टँकर, उद्योजकांना होणारा त्रास, वाहतूक कोंडीची समस्या यावरून महाविकास आघाडीकडून भाजपला घेरण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. या ‘हाय व्होल्टेज’ लढतीमध्ये मतदारराजा कोणाच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकणार, हे निकालाअंतीच स्पष्ट होईल. मात्र, सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमधील या लढतीने भोसरीचे वातावरण तापले आहे.
भोसरीचा सामना होणार चुरशीचाएकूण मतदार
पुरुष - ३ लाख २४ हजार ६९९
महिला - २ लाख ७६ हजार ५२इतर - ९७
एकूण - ६ लाख ८४८
लोकसभेला काय झाले?
भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभेला महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना येथून ९,५७२ मताधिक्य मिळाले. आता महायुतीमध्ये फूट पडून त्यावेळचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे समीकरणे बदलली आहेत.
गावकी-भावकी ठरणार निर्णायक
भोसरी मतदारसंघाच्या इतिहासामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. येथील निवडणुका पै-पाहुणे आणि गावातील स्थानिक कोणाच्या पाठीशी राहतात, त्यावर फिरतात. महेश लांडगे आणि अजित गव्हाणे हे दोघेही भोसरीचे स्थानिक उमेदवार असून, दोघांचेही पै-पाहुणे मतदारसंघात आहेत.