पिंपरी : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर हिंजवडी येथील भुजबळ वस्ती येथे देखील भरधाव कारचा अपघात झाल्याचा प्रकार घडला. याबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, याप्रकरणी कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याने पायी जात असताना तिच्या पाठीमागून भरधाव कार आली. या कारने पादचारी तरुणीला धडक दिली. त्यानंतर ही कार एका दुकानात शिरली. कारच्या जोरदार धडकेत तरुणी दूरवर फेकली गेली. तसेच दुकानाचेही नुकसान झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. या व्हिडिओनुसार हे सीसीटीव्ही फुटेज असून २३ मे २०२४ रोजीची ही घटना असल्याचे दिसून येते.
याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात म्हणाले, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी संपर्क साधला. तसेच संबंधित दुकानदाराशी देखील संपर्क साधला. मात्र, त्यांनी तक्रार नसल्याचे सांगितले. असे असले तरी याप्रकरणी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संबंधित तरुणी सुखरूप आहे.