तळवडे : चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे हद्दीतील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी; अन्यथा १ आॅक्टोबरपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा निघोजे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तरुण व ग्रामस्थांनी दिला आहे.
चाकण औद्योगिक टप्पा क्रमांक १, ३ व ४ मध्ये औद्योगिकीकरण झाल्यानंतर नोकरी मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी तुटपुंजा जमिनी दिल्या; परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यांच्या मुलांना तर आलेल्या कंपन्यात नोकरी-व्यवसाय मिळत नसून लहानमोठे व्यवसाय करतानादेखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.निघोजे (ता. खेड)च्या स्थनिक भूमिपुत्र युवकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडे वेळोवेळी नोकरीची मागणी केली; परंतु त्यात अपयश आल्याने अखेर उपोषण करणार असल्याचे सरपंच रमेश गायकवाड यांनी सांगितले. चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना कायमस्वरूपी नोकºया देण्यात याव्यात, याला कारखानदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या भागातील अनेक उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रोत्साहन तसेच सवलतीचा लाभ घेतला आहे.पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणींत ८० टक्के स्थानिकांना नोकरी देणे आवश्यक आहे; परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. हिंदी भाषकांना त्वरित नोकरी दिली जाते.चाकण एमआयडीसीत प्रकल्प मोठ्या झपाट्याने वाढत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदल्यात रोजगार दिला जातो. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून परिसरातील मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली. निघोजे गावातील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.