पिंपरी : छापा टाकून पोलिसांनी ३१ लाख ४५ हजार ७१४ रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख २५ हजारांची चारचाकी तीन वाहने व १३ हजारांचे दोन मोबाईल फोन जप्त केले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने हिंजवडी येथे बुधवारी (दि. ९) ही कारवाई केली.
पारसराम चाैथाराम मेगवाल (वय ४५), ललीत गोविंदराम खारोल (वय २३), शाम शंकरलाल चाैधरी (वय ३२, तिघेही रा. साखरेवस्ती रोड, हुलावळे बेंद्रे वस्ती, हिंजवडी फेज -१) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी पारसराम मेगवाल व ललीत खारोल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मूळ मालक असलेला आरोपी शाम चाैधरी फरार आहे.
आरोपी शाम चाैधरी हा हिंजवडी येथे गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १० दिवसांपासून पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. तसेच बुधवारी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी भाड्याच्या रुममधून वाहनांमध्ये गुटख्याचा माल भरत असताना आरोपी मिळून आले. पोलिसांनी या छाप्यात ३१ लाख ४५ हजार ७१४ रुपयांचा गुटखा, १२ लाख २५ हजार रुपयांची तीन वाहने, तसेच १३ हजारांचे दोन मोबाईल, असा ४३ लाख ८३ हजार ७१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सदर ठिकाणी भेट देऊन जप्त मुद्देमालाची पाहणी केली.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, नितीन लोंढे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.