तळेगाव दाभाडे: इंदोरी (ता. मावळ)येथील खासगी कंपनीस आग लागली. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.२९)सकाळी ८.३०च्या सुमारास घडली.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सुरक्षेची व्यवस्था चोख असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंदोरी येथील पानसरे वस्ती येथे असलेल्या 'अर्चिज इंटरप्राइजेस इंडिया आणि अर्चिज पॅकेजिंग इंडिया' या कंपनीस शुक्रवारी सकाळी आग लागली.या दोन्ही कंपन्या पॅकेजिंग मटेरियल निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.या आगीत मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जळून खाक झाला. मशिनरीलाही मोठी झळ बसली. आगीची तीव्रता वाढत गेली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट लांबून दिसत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने दोन दिवसांपूर्वीच कामगार कामावर रुजू झाले होते. स्वच्छतेनंतर आज प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार होते.कंपनीत एकूण १२५ कामगार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक कामगार आपापल्या गावी गेले आहेत. आग लागली तेव्हा कंपनीत २० कामगार कामावर होते,अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ कार्ले यांनी दिली. आगीचे वृत्त समजताच सर्वप्रथम तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.अग्निशमन पथकातील फायरमन गणेश जावळेकर, बाळू ठाकर, रोहित पवार,बाळू चव्हाण,आकाश ओव्हाळ यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तळेगाव एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीचे अग्निशमन बंब दाखल झाले.सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन पथकास यश आले.
इंदोरीत खासगी कंपनीला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 3:56 PM
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने दोन दिवसांपूर्वीच कामगार कामावर रुजू झाले होते. स्वच्छतेनंतर आज प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार होते.
ठळक मुद्देतीन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात