पिंपरी : दुचाकीस्वाराने दुचाकीला पाय लावून धक्का देण्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळतो. मात्र, पुणे येथे एका रिक्षावाल्याने मर्सिडिज गाडीला पाय लावून धक्का देत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. असाच एक प्रकार पिंपरी येथे समोर आला आहे. एक दुचाकीस्वार एका टेम्पोला पाय लावून धक्का देत होता. त्यामुळे टेम्पो गर्दीच्या वेळेत भर रस्त्यावरून सुसाट वेगाने जात होता.
पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक दुचाकीस्वार एका टेम्पोला पाय लावून धक्का देत होता. सायंकाळी गर्दीच्या वेळेत भर रस्त्यात हा धक्का देण्याचा प्रकार सुरू होता. दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी चालवून टेम्पोला पाय लावून धक्का देत होता. त्यामुळे टेम्पो देखील सुसाट वेगाने जात होता. मात्र, त्यामुळे इतर वाहनांचा खोळंबा झाला.
दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण इतर वाहनचालकांना बाजूने जाण्याबाबत सांगत होता. त्यानुसार इतर वाहनचालक खबरदारी घेत होते. हा प्रकार काही जणांनी मोबाईलमध्ये रेकाॅर्डिंग करण्याचा तसेच फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पोला पाय लावणारा दुचाकीस्वार त्यांना विरोध करत होता. हा टेम्पो इलेक्ट्रिक असून काही कारणास्तव त्याला ढकलत नेण्यात येत हाेते. असे असले तरी टेम्पोवाला आणि दुचाकीस्वार यांच्या या ‘ढकलगाडी’मुळे इतर वाहनचालकांना हसू आवरेनासे झाले.