पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. २१) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश शंकर शेडगे (वय २२) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिवाजी तानाजी शेडगे (३९, रा. भुगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रक चालक विशाल छगन पवळे (३२, रा. पिरंगूट, ता. मुळशी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याने त्याच्या ताब्यातील ट्रक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालविला. गणेश शेडगे हे दुचाकीवरून जात असताना त्या दुचाकीला विशाल याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करत असताना ट्रकची दुचाकीला धडक दिली. यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर विशाल ट्रक सोडून घटना स्थळावरून पळून गेला. सहायक पोलिस निरीक्षक पूनम जाधव तपास करीत आहेत.
अपघातातील ट्रक जमावाने जाळला
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. जमावातील लोकांनी ट्रक पेटवला. यात ट्रकची केबिन जळाले. याप्रकरणी मयूर सतीश भरेकर, सुरज अनिकांत भरेकर, सचिन शेडगे, शंकर शेडगे, समीर शेडगे, मयूर भालेकर, सुरज भालेकर व इतर ८ ते १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार नवनाथ क्षिरसागर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.