पिंपरी: कोव्हीड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार समोर येत असतानाच चोरट्यांनी चक्क कॉम्पुटर चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड सेंटर येथे २५ मेला रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रीती जोसेफ व्हिक्टर (वय ५०, रा. कोंढवा, पुणे) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिक्टर या पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोव्हीड सेंटरच्या व्यवस्थापक आहेत. अज्ञात चोरट्याने सेंटरमधील ३३ हजार १०१ रुपये किमतीचा सीपीयू, ७ हजार ४५७ रुपयांचा एक मॉनिटर, १ हजार १८६ रुपये किंमतीचा किबोर्ड, असा एकूण ४७ हजार ८४५ रुपये किमतीचा माल चोरून नेला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मागच्या महिन्यात दागिने चोरीच्याही घटना
एप्रिल आणि मे महिन्यात पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने तात्काळ निर्णय घेऊन कोव्हीड सेंटर चालू केले. बरेच रुग्ण या सेंटरमधून बरे होऊन घरी परतले आहेत. पण अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. त्यावर महापालिकेने सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही या घटना थांबल्या नाहीत. आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने चोरटयांनी सेंटरमधील वस्तूंवरच डोळा ठेवल्याचे दिसून येत आहे.