पिंपरी : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पन्नास नगरसेवकांनी आघाडीचे काम केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. परंतु, नगरसेवकच काय, आमचा स्वीकृत सदस्यही फुटणार नसल्याचा दावा, भाजपाने केला आहे.महाशिवआघाडीचे सरकार राज्यात येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेवर परिणाम होऊ नये, याची दक्षता भाजपाकडून घेतली जात आहे. ‘‘भाजपाच्या सुमारे ५० नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व पुरस्कृत अपक्ष उमेदवारांचे पडद्याआडून काम केले. राज्यात भाजपाची सत्ता गेल्याने मूळ राष्ट्रवादीतून गेलेल्या नगरसेवकांकडून महापौर निवडणुकीत फुटाफूटीची शक्यता आहे, असा दावा प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला............राज्यातील भाजपाची सत्ता गेली आहे. आता महापालिकाही हातातून जाईल, या भीतीने दोन्ही आमदारांना पछाडले आहे. त्या निवडणुकीस मूळचे राष्ट्रवादीचे असलेले मात्र, सध्या भाजपामध्ये गेलेल्या नगरसेवकांकडून दगाफटका होण्याची शक्यता त्यांना सतावत आहे. विधानसभेला भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मदत केल्याने आमचे मताधिक्य वाढले. राज्यात भाजपाची सत्ता आली असती तर, मताधिक्य घटल्याच्या कारणाने या दोन्ही आमदारांनी प्रत्येक नगरसेवकांची खरडपट्टी काढून अपमानित करण्याचे सत्र सुरू केले असते. मात्र, आता गोंजारण्याचे काम सुरू आहे. - प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी .......पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे पन्नास नगरसेवक फुटून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना पडू लागले आहे. भाजपाचे नगरसेवक फोडण्याचा त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपाचा एक मंडलाध्यक्षही फुटणार नाही. - तुषार कामठे, नगरसेवक, भाजपा.