पिंपरी : शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. युती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडल्यास आणि उमेदवार पडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांत जुंपली आहे. चिंचवड येथील एका कार्यक्रमात दोन महिन्यापूर्वी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले असताना चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील ३० नगरसेवक आणि नेते गडकरी यांना भेटले. त्यात माजी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, शितल शिंदे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, मोना कुलकर्णी, सुजाता पालांडे यांचा समावेश होता. पत्रातील मजकूर असा, ‘‘ शिवसेनेशी युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. युती होऊ अथवा न होऊ याबाबत आमचे काहीही म्हणने नाही. युती झाली तरी आम्हाला काही हरकत नाही. मात्र, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, नेत्यांविषयी टीका केली आहे. निर्णयावर टीका केली आहे. गेल्या निवडणूकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे राण करून शिवसेनेचा उमेदवार निवडूण आणला. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला नाही. त्यामुळे भाजपाचा कोणताही उमेदवार त्याचे काम करण्यास उत्सुक नाही. शिवसेनेने दुसरा कोणताही उमेदवार दिला तरी त्याचे आम्ही काम करू. तसेच मावळ लोकसभेची जागा ही भाजपालाच मिळायला हवी. बारणे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होईल. त्याचे खापर भाजपाच्या माथी येऊ नये, म्हणून हा मतदार संघ भाजपालाच मिळायला हवा.’’