पिंपरी : महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर भाजपाने पक्षविस्तारावर भर दिला आहे. ज्या ठिकाणी भाजपाचे खासदार नाहीत, अशा मतदार संघांत विस्तारक पाठविण्याची योजना पक्षाने आखली आहे. परंतु, राज्यात एक नंबर असलेल्या भाजपाला विस्तारक मिळेनात अशीच परिस्थिती आहे. विस्तारक म्हणून काम करण्यासाठी आमदार, खासदार, नगरसवेक, महापौर, सभापती, अनुत्सुक असल्याची नाराजी पक्षश्रेष्ठींनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. परिणामी प्रशिक्षण देण्यासाठी दोन तारखा निश्चित केल्या होत्या; परंतु विस्तारकच नसल्याने तारखा रद्द केल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्रात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यानंतरची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे नुकतीच झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अनेकदा आवाहन करूनही विस्तारकांची नावे पक्षाकडे येत नाहीत. ज्या भागात भाजपाचा खासदार नाही, आमदार नाही व जिथे ताकद कमी आहे. त्या ठिकाणी आणि सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पक्षाने गावोगावी विस्तारक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पदे आणि लाल दिव्यांच्या गाड्यांचा सोस असणाऱ्या नेत्यांना विस्तारक होण्यात रस नाही. प्रथम क्रमांकाच्या पक्षाला विस्तारक मिळत नसल्याचे सांगताही येत नाही. (प्रतिनिधी)
भाजपाला मिळेनात विस्तारक
By admin | Published: April 29, 2017 4:02 AM