पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारांची कमी नाही. पक्षाने निवडणूक लढवण्याबाबत आदेश दिल्यावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सद्यस्थितीत मावळ लोकसभा महायुती म्हणून लढण्यासाठी तयारी करायची आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. ११) पिंपरी-चिंचवडचा दौरा नियोजित केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष जगताप बोलत होते. यावेळी, विधानपरिषद आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा आमदार आश्विनी जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा राज्यभरातील संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघांचा दौरा सुरू आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे बुधवारी सायंकाळी ४ वाजता किवळे-मुकाई चौक येथे आगमन होवून त्यांचे शहर भाजपा, महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येईल.” लोकसभा उमेदवाराविषयी विचारले असता जगताप म्हणाले, “मावळ लोकसभा महायुतीमध्ये कोणता पक्ष लढवणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी त्यासाठी इच्छुक नाही. पक्षाने आदेश दिलाच तर भाजपकडे अनेक उमेदवार आहेत”
‘भाजपा वॉरियर्स’शी साधणार संवाद
पिंपरी-चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील ‘भाजपा वॅारियर्स’ शी संवाद साधणार आहेत. यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘घर चलो अभियान’ अंतर्गत पिंपरी, राधिका चौक येथून अभियानाला सुरुवात होईल. त्यानंतर, शगुन चौक व साई चौक परिसरातील नागरिकांची भेट घेतील. या ठिकाणी त्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन देखील करण्यात आले आहे.