पिंपरी : महापालिका पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपची सरशी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप गटाची सरशी झाली आहे. प्रभाग अध्यक्ष होण्यास सदस्य इच्छुक नसल्याने दोन प्रभागावर जुन्या च सदस्यांना संधी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी होती. या मुदतीत केवळ भाजप नगरसेवकांनी अर्ज भरले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवड होणार निश्चित होते. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे.
महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आठ प्रभाग अध्यक्षपदासाठी आठच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
......... यांना मिळाली संधी
आठही समित्या भाजपच्या हाती गेल्या आहेत. 'अ' प्रभाग अध्यक्षपदी शर्मिला बाबर, 'ब' सुरेश भोईर, 'क' राजेंद्र लांडगे, 'ड' सागर आंगोळकर, 'ई' विकास डोळस, 'ग' बाबा त्रिभुवन, 'ह' हर्षल ढोरे आणि 'फ' प्रभाग अध्यक्षपदी कुंदन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाबर, त्रिभुवन यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले. .........राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्लक्ष
प्रभाग समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर काही प्रभागात उमेदवारी घेण्यास उत्सुक नसल्याने दोन जणांना पुन्हा संधी दिली आहे. आठपैकी एकाही प्रभागात दोन्ही पक्षांनी अर्ज न भरल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.