पुणे : महापालिका निवडणुका अवघ्या १५ दिवसांवर आल्या असताना रिपाइंच्या प्रदेश कार्यकारिणीकडून पुण्यातील भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या सर्व पत्रक व प्रचारसाहित्यावर भाजपा व रिपाइं युती असे छापण्यात आले आहे. ऐनवेळी रिपाइंचा निर्णय जाहीर झाल्याने आता सर्वांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.रिपब्लिकन पक्षाच्या राज्य पातळीवर झालेल्या निर्णयानुसार भाजपाबरोबरची युती तोडण्यात आली आहे. भाजपाकडून यंदाच्या वेळी प्रथमच महापालिकेत आरपीआयसोबत युती करण्यात आली आहे. दलित मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या प्रचारामध्ये भाजपा- आरपीआय युतीचा सातत्याने उच्चार केला जातो. त्यामुळे आता ऐनवेळी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला. भाजपाकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या डॉ. सिद्धार्थ धेंडे, फरजाना शेख, वैभव पवार, सोनाली लांडगे, सुनीता वाडकर, रिना आल्हाट, विशाल शेवाळे, नवनाथ कांबळे, यादव हरणे, सत्यभामा साठे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या अर्जांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, पक्षाच्या मतदारांमध्ये मात्र वेगळा संदेश जाण्याची भीती आहे. हे बहुतांश उमेदवार आरपीआयचे प्राबल्य असणाऱ्या भागातून लढत आहेत. या भागात भाजपाचा फारसा प्रभाव आजपर्यंत राहिलेला नाही.
रिपाइंने युती तोडल्याने भाजपासमोर पेच
By admin | Published: February 09, 2017 3:35 AM