पिंपरी : महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होती. आगामी महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, अशी भूमिका ‘भाजप’चे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर निर्विवाद वर्चस्व होते. भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. आता अजित पवार हेच महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र की स्वबळावर लढणार, याची चर्चा सुरू होती. मात्र, शंकर जगताप यांच्या वक्तव्याने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, भाजप महापालिकेच्या सर्व १२८ जागा लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नसणार आहे. भाजप नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणली जाणार आहे. मागीलवेळी भाजपचे ७७ नगरसेवक होते. यावेळी त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
नाना काटे यांची उपस्थिती चर्चेची
महापालिकेत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, चेतन भुजबळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नीता पाडाळे, ज्योती भारती, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, संदीप गाडे, सिद्धेश्वर बारणे, विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, आरती चोंधे, निर्मला कुटे, सागर अंघोळकर, वैशाली जवळकर आदी उपस्थित होते. भाजप पदाधिकारी बैठकीस नाना काटे यांची उपस्थिती चर्चेची ठरली.