पिंपरी : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील महिला वॉर्डमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमावा यासह प्रमुख मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले. यावर तात्काळ कार्यवाही झाल्यास अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी व्यक्त केला.
कोविड सेंटरमधील महिला रुग्णांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भाजपा महिला मोर्चातर्फे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले. ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाला प्रमुख मागण्यांचे निवेदनही दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेश पदाधिकारी शैला मोळक, शहराच्या अध्यक्षा उज्वला गावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारती विनोदे, कोमल काळभोर, जिल्हा सरचिटणीस दिपाली धनोकार, सुप्रिया पाटील, शहर महिला सरचिटणीस सोनम मोरे, दीपाली धनोकार शहर उपाध्यक्ष रंजना चिचवड़े, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षा खापरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात महिला आघाडीच्या वतीने आंदोलन केले. सर्व महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्याद्वारे कोविड सेंटरमधील महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षा मिळावी. यासाठी प्रामुख्याने महिला सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. कोविड सेंटरच्या बाहेर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असावी. पोलिसांकडे पीपीई किट असावे. कदाचित काही घटना घडली तर पोलिस यंत्रणा तिथे ताबडतोब पोहोचली पाहिजे. ज्या रूममध्ये महिला अॅडमिट आहे तिथे बेलची व्यवस्था केलेली असावी, आदी मागण्या केल्या.’’
पोलीस आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद...एखाद्या फेस्टिवलसाठी पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिका एकत्रित काम करत असतात तसेच काम कोविड सेंटरच्या संदर्भात सुद्धा करावे, अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, महापालिका आयुक्तांना फोन करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.