पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर यांनी माघार घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक झाली. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल पीठासन अधिकारी होत्या. दरम्यान, महापालिकेतील संख्या बळानुसार घुले यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.
केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी भाजपकडून हिराबाई घुले यांनी तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी करून दोघांचे अर्ज वैध ठरले. पीठासन अधिकारी अग्रवाल यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटांची वेळ दिली होती. निर्धारित वेळेत भालेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे पीठासन अधिकारी अग्रवाल यांनी घुले बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले. दिघी- बोपखेल प्रभाग क्रमांक चारचे प्रतिनिधित्व हिराबाई घुले करीत आहेत. गेल्या चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे.