भाजपाचे रवी लांंडगे बिनविरोध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ च्या जागेवरीलभाजप युवा मोचार्चे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असून, शहरात भाजपाने खाते उघडले आहे.
महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. भोसरीतील एक जागा बिनविरोध करण्यात भाजपाला यश आले आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राजकीय घडामोडी
महापालिकेच्या निवडणूकीत भोसरीतील याच जागेत रवी लांडगे यांच्या विरोधात शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेने उमेदवार दिले नव्हते. तर अपक्ष म्हणून सुलोचना बढे आणि योगेश लांडगे यांनी अर्ज भरले होते. सुलोचना बढे यांनी सोमवारी माघार घेतली. त्यानंतर योगेश यांनी आज माघार घेतली. भाजपाचे माजी शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्यांचे संबंध होते. त्यामुळे लांडगे यांचे पुतणे म्हणून त्यांना संधी मिळण्यासाठी अन्य पक्षांनी उमेदवार दिले नसल्याची चर्चा आहे.
बिनविरोधची परंपरा
महापालिकेच्या गेल्या तीन निवडणूकींपासून एकतरी नगरसेवक बिनविरोध येण्याची पंरपरा कायम आहे. महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद शेख बिनविरोध निवडून आले होते. २०१२ मध्ये चिंचवड विधानसभेतील पिंपळेगुरव परिसरातून राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे आणि रामदास बोकड हे बिनविरोध निवडून आले होते. आता २०१७च्या निवडणुकीत भोसरीतून रवी लांडगे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिका निवडणुकीतील बिनविरोधची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. रवी लांडगे यांचे दिवंगत वडील लक्ष्मण लांडगे भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची विरोधी पक्षनेते होते. तसेच भाजपा शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे ते पुतणे होत.