भाजपमुळेच स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:16 AM2019-07-18T11:16:52+5:302019-07-18T11:17:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी होते...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आमच्या काळात बेस्ट सिटी होते. त्यानंतर स्मार्ट सिटी झाले. आता मात्र सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी केली.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पवार प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे, नाना काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख, उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, भाजपचेच नगरसेवक महापालिकेत कचरा टाकत आहेत. सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देत आहेत. शहरातील 15-15 दिवड कचरा उचलला जात नाही. नवीन गाड्या घेऊन देखील कचरा समस्या मार्गी लागली नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. "
पवार म्हणाले, कचऱ्याची निविदा मंजूर, रद्द आणि पुन्हा मंजुरीचा घोळ घातला. जनतेचे हित पाहिले नसल्याने शहर कचऱ्यात गेले. सलग दोन वर्षे स्वच्छ भारत अभियानात शहराची घसरगुंडी होत आहे.