पिंपरी : सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ महापौर नितीन काळजे यांच्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने दिला आहे.याबाबत विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामांचा शंभर टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लोकशाही मार्गाने केली होती. परंतु, महापौर काळजे यांनी गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, मयूर कलाटे यांना तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबित केले आहे.राष्ट्रवादी सत्तेत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अनेकदा सभागृहात गैरवर्तन केले आहे. आताचे सत्ताधारी विरोधात होते. त्या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या अंगावर धावून गेले होते. भाजपा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या कक्षातील अध्यक्षांच्या टेबलवर नाचून गोंधळ घातला होता. पण त्या वेळेस देखील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाचे निलंबन वा कोणतीही कारवाई केली नव्हती. अशी आठवणही गव्हाणे यांनी सत्ताधाऱ्यांना करुन दिली आहे.(प्रतिनिधी)
महापौरांच्या कार्यक्रमात काळे झेंडे
By admin | Published: April 24, 2017 4:44 AM