रावेत : घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील व पदाधिकारी बुधवार (दि. २१) रोजी रहाटणीकडून काळेवाडीकडे जात असताना सिद्धनाथ गॅस सर्व्हिस रहाटणी काळेवाडी रोड, या ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर एका विना क्रमांकाच्या तीनचाकी टेम्पोमधून, सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात खाली करताना आढळले. तेव्हा हा गैरप्रकार असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, रतन गॅस एजन्सी काळेवाडी यांचाकडील घरगुती सिलेंडर वितरणासाठी वापरणात येणारा टेम्पो हा या ठिकाणी घरगुती वापराच्या गॅसचा काळा बाजार करत असल्याचे लक्षात आले. दुकानात पाहणी केली असता ८ बाय ८ जागेत मोठ्या प्रमाणात घरगुती व कमर्शिअल वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला. त्यावेळी छावा मराठा युवा महासंघ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांनी १०० नंबरला फोन करून हा गैरप्रकार चालू असल्याचे कळवले. गणेश सरकटे पाटील यांनी पुरवठा विभाग अधिकाऱ्याला माहिती देऊन बोलावून घेतले. पिंपळे सौदागर चौकीत ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्याने मुद्देमाल जप्त करून चौकीत नेला. पुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, राजेंद्र देवकर-पाटील, गणेश सरकटे-पाटील, सचिन आल्हाट, गौरव धनवे नाना फुगे, विजय लोट आदींनी सहभाग घेतला.छावा युवा मराठा महासंघाने घरगुती गॅसच्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात होणाऱ्या काळ्या बाजाराबद्दल, १२ जानेवारी २०१८ रोजी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासन (डीसीपी कार्यालय) यांना निवेदन देऊन या गैरप्रकारावर आळा घालण्याची विनंती केली होती.
पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा काळाबाजार; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:56 IST
घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा काळाबाजार; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठळक मुद्दे८ बाय ८ जागेत घरगुती व कमर्शिअल वापराच्या गॅस सिलेंडरचा आढळून आला साठापुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन केला पंचनामा