पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे सर्जिकल स्ट्राइक या उद्देशाने मंगळवारी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांना या नोटा बँकेत जमा करण्याची ५० दिवसांची मुदत दिली. ही माहिती मिळताच अनेकांचे धाबे दणाणले. घरातील हजार-पाचशेंच्या नोटांचा समावेश असलेल्या मोठ्या रकमेचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून काहींनी कोट्यवधींचा काळा पैसा जमा करून ठेवला आहे. एवढी मोठी रक्कम बँकेत जमा करता येत नाही. भविष्यात वापरातही येणार नाही. त्यामुळे नेमके काय करायचे, असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दोन दिवस बँका व एटीएम बंद राहतील, असे नमूद केल्याने व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. एटीएम केंद्रात नोटा स्वीकृतीच्या यंत्रांवर काहींनी तर रात्रीच धाव घेतली. हजार, पाचशेच्या नोटा त्या यंत्रात जमा केल्या. नोटांचा भरणा करण्यासाठी अक्षरश: रात्री गर्दी उसळली. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, अशांनी खासगी पतसंस्था, सहकारी बँकांकडे धाव घेतली. आपल्याकडील रक्कम त्या पतसंस्थेत आणि सहकारी बॅँकेत भरण्यास प्राधान्य दिले. जमीन खरेदी विक्री करणारे एजंट, रिअल इस्टेट व्यावसायिक ज्यांची दिवसाची आर्थिक उलाढाल मोठी आहे, अशांचे धाबे दणाणले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम भरताना पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅनकार्डशिवाय मोठी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बेहिशेबी मोठी रक्कम बँकेत भरायची झाल्यास पैसे कोठून आले हे प्राप्तिकर खात्याला दाखवून देणे भाग पडणार आहे. आतापर्यंत प्राप्तिकर खात्याची दिशाभूल करून शासनाचा कर न भरणाऱ्यांना काळा पैसा लपविणे अवघड जात आहे.(प्रतिनिधी)
शहरातील काळा पैसावाल्यांना हादरा
By admin | Published: November 09, 2016 2:42 AM