पिंपरी : पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीतील जलपर्णीमुळे डासांचा त्रास वाढला आहे. कोटयवधी रुपये खुर्चुनही जलपर्णी तशीच आहे. याबाबत सत्ताधारी भाजप आक्रमक झाली आहे. जलपर्णीस कारणीभूत असणा-या ठेकेदारास काळया यादीत टाकावे, आरोग्य प्रमुख डॉ. अनिल रॉय यांना निलंबित करावे, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी असून बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत. नदीतील जलपणीर्मुळे शहरातील सर्व नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्र जलपणीर्ने व्यापले असून महानगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नदी पात्रातील जलपर्णी काढण्याबाबत ठेकेदाराचे हलगर्जी व निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार माजी महापौर राहुल जाधव यांनी सर्वसाधारण सभेत केली होती.याबाबत आज सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले आदी उस्थित होते.महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘शहरातील नद्यामधील जलपर्णी काढण्याचे काम हे एकाच ठेकेदारास देण्यात आले असून ठेकेदार कोणतेही काम न करता आणि जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो. पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते. व महापालिकेकडून सदर ठेकेदाराचे बिल देखील अदा करण्यात येत आहे.’’सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘ ठेकेदारावर व त्याचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे असताना देखील त्यांचेकडून अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत आहे. नदीतील जलप्रदुषणाचा तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन संबंधित अधिका-याचे तात्काळ निलंबन करण्यात येऊन संबंधित ठेकेदार हा जलपर्णी काढण्याचे काम व्यवस्थित करत नसल्याने मनपाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून नद्यामधील जलपणीर्शी संबंधित कामाचे बील देऊ नये.’’
जलपर्णीस कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका, डॉ. रॉय यांना निलंबित करा; महापौरांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 12:17 AM