पिंपरी : शहरामध्ये व्हायरल आजारांची साथ आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्याठिकाणी रक्ताची चाचणी करून रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यासाठी तब्बल सहा दिवस लागत असल्याचे समोर आले आहे. शहरामध्ये महापालिकेचे आठ मोठे रुग्णालय आहेत. तर उपनगरांमध्ये दवाखाने उभारण्यात आले आहे. या दवाखान्यामध्ये स्थानिकांची मोठी गर्दी असते. त्यातच सद्यस्थितीत शहरामध्ये साथीचे आजार वाढले आहेत. रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आढळत असल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जात आहे. मात्र, पिंपळे गुरव येथील मनपा दवाखान्यामध्ये रुग्णाला तब्बल सहा दिवसानंतर रक्ताचा अहवाल घेण्यासाठी येण्यास सांगितले. मंगळवारी (दि. १०) सकाळी एक रुग्ण मनपा दवाखान्यामध्ये तपासणी करण्यासाठी पोहचला. ताप, अंगदुखी तसेच सर्दी व खोकला अशी लक्षणे होती. दवाखान्यात पोहचल्यानंतर संबंधित रुग्णाला रक्ताची चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यासाठी दवाखान्यात रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णाला ‘सहा दिवसांनी अहवाल येईल, सहा दिवसांनी अहवाल घ्यायला या’ असे सांगितले.
एवढ्या दिवसांनी अहवाल येत असल्याने तोपर्यंत रुग्णांची तब्येत आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तसेच आजाराचे निदान लवकर होत नसल्याने त्यावर उपचार काय करायचे याबाबत डॉक्टरही अनभिज्ञ असतात. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालय गाठावे लागत असल्याचे समोर आले आहे. तर ज्या रुग्णांची खासगी रुग्णालयात जाण्याची परिस्थिती नसते अशा रुग्णांची तब्येत आणखी खालावत असल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाची कंत्राटी लॅब
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये राज्य शासनाने रक्ततपासणीचे कामे ठेकेदार संस्थेला दिले आहे. हिंदलॅब्सच्या वतीने रक्ताचे नमुने घेऊन त्यांची चाचणी केली जाते. मात्र त्याचा अहवाल देण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा वेळ लागत आहे. त्यामुळे या कंत्राटी लॅबवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दवाखान्यांमध्ये शासनाने लॅब नेमली
शहरातील काही दवाखान्यांमध्ये वेळ लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णावर काय उपचार करायचे याबाबत अडचणी निर्माण होतात. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने चाचण्या केल्या जातात. मात्र दवाखान्यांमध्ये शासनाने लॅब नेमली आहे. अहवालासाठी उशिर होत असल्याचे राज्य शासनाला कळवले आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.