पिंपरी : तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवल्याच्या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यातील दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांना गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच संशयितांनी मद्यपान केले आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी ते नमुने पुण्यातील गणेश खिंड येथील रासायनिक विश्लेषकाकडे पाठवण्यात येणार आहेत.
कमलेश उर्फ अशोक पाटील (२३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर उर्फ मोन्या चंद्रकांत म्हाळसकर (२६, रा. तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कल दराडे (२२, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यातील हेमंत म्हाळसकर याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर कमलेश आणि प्रथमेश या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कमलेश आणि प्रथमेश यांना गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. जेकेरिया जेकब मैथ्यू (२३, रा. निगडी) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. २) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी (दि. १) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बिजलीनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेकेरिया आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. कमलेश याने त्याच्या ताब्यातील महागड्या कारने फिर्यादी जेकेरिया यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे जेकेरिया यांनी त्याचा कमलेश याला जाब विचारला. त्या कारणावरून त्यांनी जेकेरिया यांना मारहाण केली. त्यानंतर जेकेरिया यांना कारने धडक दिली. त्यात जेकेरिया हे कारच्या बोनेटवर पडले. संशयितांनी फिर्यादी यांना बोनेटवरून आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक बिजलीनगर दरम्यान नेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले.
दरम्यान, कारमधील महिलेसाठी संशयितांनी कार थांबवली. त्यावेळी फिर्यादी जेकेरिया हे बोनेटवरून खाली उतरले. त्यांनी लगेचच पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रथमेश याला ताब्यात घेतले. त्यानंतर कमलेश आणि हेमंत यांना देखील ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के तपास करीत आहेत.
तीन ते सहा महिन्यांत येणार अहवाल
याप्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ११५ (२), ३५२ ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयितांच्या रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषकाकडे पाठवण्यात येणार आहेत. नमुन्यांची तपासणी होऊन तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत अहवाल प्राप्त होऊ शकतो. मद्यपान केल्याचे त्यात निष्पन्न झाले तर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ प्रकरणी गुन्ह्यात कलम वाढ करण्यात येणार आहे.