पिंपरी : राजकीय दबावाला बळी पडून पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत करू नका. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व भागांत समान पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत.भोसरी परिसर आणि समाविष्ट गावांत सध्या पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची बैठक आळंदी येथील गेस्ट हाऊसवर घेतली. उपनगरांमध्ये सध्या पाणी समस्या जाणवू लागली आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, काही ठिकाणी राजकीय दबावाला बळी पडून संबंधित अधिकारी ठरावीक सोसायट्यांना मुबलक पाणीपुरवठा करून घेत आहेत. परिणामी अन्य भागात पाणी कमी आहे. त्यामुळे चऱ्होली, मोशी, दिघी आदी परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, भोसरी विधानसभा मतदारसंघात समान पाणीपुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली.कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी म्हणाले, ‘‘दिघी येथील पाणी टाकीसह भोसरी एमआयडीतील पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार लांडगे यांनी आढावा बैठक घेतली होती. पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत आम्ही ठोस कार्यवाही करणार असून, व्हॉल्व्हमनबाबतच्या तक्रारींचाही निपटारा करण्यात येईल’’ (प्रतिनिधी)
पालिका अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
By admin | Published: March 21, 2017 5:09 AM