पिंपरी - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाºया एका महिलेसह दोघांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मर्सी जोएल फर्नांडिस (वय ३६, रा. सत्यरिव्हर अपार्टमेंट) व सतीश रमेश जाधव (वय ३७, रा. शिवरामनगर, गल्ली क्रमांक १, पिंपळे गुरव) अशी त्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांना ३ जानेवारीला फर्नांडिस यांनी फोन करून आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्याकडे एका व्यक्तीची माहिती विचारली. ही माहिती व कागदपत्रे दिल्यास त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊ व त्यातील काही रक्कम तुम्हाला देऊ, असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. ५ जानेवारीला प्रत्यक्ष भेटून चर्चा करू व पुढील धोरण ठरवू असे कळविल्यानंतर तक्रारदार यांनी फर्नांडिस यांना नाव विचारले. नाव समजल्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधला व त्यांना आलेल्या फोनबाबतची कल्पना दिली. तसेच तक्रारदार यांनी फर्नांडिस यांच्याबाबत तक्रार दिली.खडकी पोलिसांनी फर्नांडिस या महिलेला पकडण्यासाठी बोपोडी येथील सह्याद्री रुग्णालय येथे सापळा रचला. तक्रारदार, फर्नांडिस व त्यांच्यासोबत असलेल्या जाधव या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाली. त्या वेळी तक्रारदाराने त्यांच्या ओळखपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘अॅन्टिकरप्शन इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ लिहिलेले ओळखपत्र दाखविले. त्याच वेळी खडकी पोलिसांनी फर्नांडिस आणि जाधवला ताब्यात घेतले.
बोगस अधिकारी खडकीमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:13 AM