पिंपरी : नावाशी साधर्म्य असलेल्या एका बोगस व्यक्तीला दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करून बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बोगस खरेदीखत तयार केले. ते खरेदीखत तलाठी कार्यालयात सादर करून एका व्यक्तीची फसवणूक केली. या बाबतीत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ डिसेंबर २०१७ ते २ मार्च २०२१ या कालावधीत मामुर्डी येथे घडला.
नीलेश आप्पासाहेब कांबळे (रा. गहुंजे), निखिल राजू बागल (रा. देहूरोड), दयानंद नानासाहेब सरवदे (रा. चांदखेड, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत उत्तम बुधन ओरसे (रा. जनवाडी, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुय्यम निबंधक हवेली, क्रमांक १४ कार्यालय, लांडेवाडी येथे फिर्यादी यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या कोणत्यातरी बोगस व्यक्तीला उभे केले. त्या व्यक्तीशी संगनमत करून तो फिर्यादीच आहे, असे भासवून फिर्यादी यांच्या नावाचे बनावट पॅनकार्ड बनवले. खोटा फोटो देऊन बनावट खरेदीखत तयार केले. तसेच खरेदी खतावर साक्षीदार म्हणून निखिल बागल आणि दयानंद सरवदे यांनी सही केली आहे. बोगस खरेदीखत मामुर्डी तलाठी कार्यालयात देऊन त्याआधारे मौजे मामुर्डी, तालुका हवेली येथील गट नंबर १५/ ३ अ / ८ मधील प्लॉट नंबर ३६ व ३७ ही मिळकत आरोपी नीलेश याने स्वतःच्या नावे करून घेतली आहे.