लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसची चोरी करुन त्या नोटिसची झेराॅक्स काॅपी तयार करत त्यावर अतिक्रमन निर्मुलन अधिकारी यांची बनावट सही करत वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगले धारकांना नोटीस बजावण्याचा महाप्रताप काही मंडळींनी केला आहे. हा सर्व प्रकार समोर येताच लोणावळा नगरपरिषदेचे अतिक्रमण निर्मुलन अधिकारी नेताजी पवार यांनी मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा मात्र नोंद करण्यात आला नव्हता. लोणावळा नगरपरिषदेच्या नावे बंगलेधारक, सोसायटीधारक यांनी धमकावत पैसे गोळा करणार्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवत नगरपरिषदेला दलालांचा विळखा हे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले होते. मात्र काल नव्याने समोर आलेल्या नोटीस चोरीच्या प्रकरणाने या प्रकारांना वेगळे वळण लागले असल्याची चर्चा सुरु आहे. वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगल्यांना आपण मंजूर नकाशापेक्षा वाढीव काम केले असल्याचे आढळून आले आहे. वाढीव कामाला मंजूर घेतली असल्यास सदर कामाची कागदपत्रे कार्यालयात सादर करा अन्यथा तातडीने सात दिवसाच्या आत ते बांधकाम काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलमान्वे कारवाई करण्यात येईल असा मजकूर असलेली नोटीस मा. चेअरमन दर्शन व्हॅली हाऊसिंग सोसायटी या नावाने बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा बजावत काही मंडळींनी बंगलरधारकांकडून कारवाई टाळण्यासाठी विशिष्टय रक्कम ठरवून घेतली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. याबाबत सोसायटीमधील एका व्यक्तीने सदर नोटीस नगरपरिषदेत दाखविल्यानंतर सदर नोटीस व त्यावरील अतिक्रमण निर्मुलन अधिकारी यांची स्वाक्षरी बोगस असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारे कोणाला नोटिसा आल्या असल्यास त्यांनी नगरपरिषदेत येऊन शहनिशा करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसीचा अपहार करुन सोसायटीला बजावल्या बोगस नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 8:30 PM