पिंपरी : कोरोना लसीकरणातील पहिला आणि दुसरा डोस टार्गेट पूर्ण झाले आहे. तसेच बुस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण लसीकरण ३५ लाख ८२ हजार ८३८ झाले आहे. पहिला डोस १८ लाख तर दुसरा डोस १६ लाख जणांनी घेतला आहे. नाकातून बुस्टर घेण्याची सुविधा खासगी रुग्णालयात आहे. त्यासाठी ९९० रुपये मोजावे लागणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ९ मार्च २०२० मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तीन लाटा येऊन गेल्या असून, तर शहरात लसीकरणाचा वेग चांगला आहे. आता चीनमध्ये कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने वैद्यकीय विभाग सज्ज आहे. पुरेशा औषधांचा साठा, लसीकरण आणि कोविड केंद्राची सज्जताही करण्यात येणार आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू आहे. त्यासोबतच दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पहिला डोस घेण्यास प्रतिसाद, दुसरा डोस घेण्यास नाही
शहराची लोकसंख्या तीस लाख असून, त्यात १८ वर्षांवरील नागरिक एकोणीस लाख आहेत. १८ लाख ९३ हजार ७२८ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. १६ लाख ८८ हजार ४१० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. कारण अनेकांनी पहिला डोस शहरात आणि दुसरा डोस दुसरीकडे घेतला आहे.
बुस्टरचे प्रमाण कमी
शहरातील अठरा वर्षांपुढील ११ लाख जणांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. तसेच पंचेचाळीस वर्षांवरील ३४ हजार लोकांनी, साठ वर्षांवरील ६६ हजार जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. खासगी रुग्णालयात नाकातून डोस दिला जाणार आहे; मात्र हा डोस सध्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसून खासगी रुग्णालयात दिला जाणार आहे.