पिंपरी : शासकीय योजनेअंतर्गत औषधोपचार पूर्णपणे मोफत असतानाही उपचारासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी रुग्णालयाच्या मार्केटिंग ऑफिसरला रंगेहाथ पकडण्यात आले. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये मंगळवारी (दि. २३) ही कारवाई झाली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय ५८, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) व प्रमोद वसंत निकम (वय ४५, रा. दत्तवाडी आकुर्डी), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी वाढोकर हा डॉक्टर असून हॉस्पिटलचा संचालक आहे. तर आरोपी निकम हा मार्केटिंग ऑफिसर आहे.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जात असताना ज्येष्ठ नागरिक असलेल्या रुग्णाच्या डायलिसिस व औषधोपचारासाठी आरोपींनी रुग्णाच्या मुलाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर रुग्णाच्या मुलाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, कर्मचारी वैभव गोसावी, प्रशांत वाळके यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना नऊ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.