पिंपरी : शाळेतून घरी आल्यानंतर सायकल घेऊन बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. दापोडी येथे सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे गुरुवारी (दि. ४) ही घटना घडली. श्रीरंग किरण जोशी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीत शिकत होता.
याबाबत माहिती अशी, श्रीरंग याची आई कोमल जोशी सीएमई येथील एका सैनिकी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर कामाला आहे. त्यामुळे सीएमईमध्ये मधील वसाहतीत जोशी कुटुंब वास्तव्यास आहे. श्रीरंग याचे वडील किरण राजकुमार जोशी एका खासगी कंपनीत वाहनचालक आहेत. जोशी कुटुंबीय मुळचे तेलंगणा राज्यातील अदिलाबाद येथील आहेत. श्रीरंग गुरुवारी दुपारी साडेबाराला शाळेतून घरी आला. त्यानंतर खेळण्यासाठी सायकल घेऊन बाहेर गेला. बराच वेळ परतला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. त्याची आई कोमल व आजी आदींनी श्रीरंग याचा शोध सुरू केला. तेथेच एक सहा ते सात फूट खोल खड्डा असून त्या खड्ड्याजवळ श्रीरंग याची सायकल दिसून आली. त्यामुळे कोमल जोशी यांनी खड्ड्याजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी श्रीरंग खड्ड्यातील पाण्यात पडला असल्याचे त्यांना दिसून आला. खड्ड्यातून काढून श्रीरंग याला तेथील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.