पिंपरी : लुटमारीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात नेले असता, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. असा काही प्रकार घडलाच नाही, असा दावा करीत चिंचवड पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा शहरात आहे. गंभीर गुन्ह्याची एखादी घटना घडली, तरी असा काही प्रकार घडलाच नाही, असे भासविण्याचे प्रकार चिंचवड पोलिसांकडून अनेकदा घडले आहेत. एका व्यापारी महिलेला दुकान बंद करताना चोरट्याने मारहाण केली. रोकड पळवली. याची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेला पोलिसांनी दाद दिली नाही. उलट प्रश्नांची सरबत्ती करून तक्रार देण्यापासून परावृत्त केले. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्या वेळी महिलेची तक्रार दाखल करून घेण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. याच भागातून चार महिन्यांपूर्वी सावकारी तगाद्यामुळे प्रसाद कदम नावाचा व्यावसायिक घरातून निघून गेला आहे. त्याच्या तपासकामी पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळत नाही. पोलीस कदम कुटुंबीयांना भेटून सावकारांच्या कर्जाची परतफेड करा, असे सांगण्यास येतात, अशी तक्रार पुणे शहर सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे केली. चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. असे अनेक प्रकार घडत असल्याचे आता चर्चेतून उघड होत आहे. (प्रतिनिधी)‘चिंग्या’ नावाचा आरोपी बेड्या तोडून पोलिसांना गुंगारा देत वायसीएम रुग्णालयातून पसार झाला. याबद्दल ‘व्हॉट्स अॅप’वर माहिती पडली. पोलिसांकडे चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार झाल्याची चर्चा चिंचवड गावातही होती. एक हवालदार आणि एक पोलीस शिपाई यांच्याबरोबर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. आरोपी पळाल्याची नामुष्की ओढवू नये, म्हणून या प्रकाराची वाच्यता होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली. आरोपी पळून गेला नाही. जामीन मिळाल्यामुळे त्याला सोडून दिले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. ए. सांगळे यांनी नमूद केले.
बेड्या तोडून आरोपीने केले पलायन
By admin | Published: August 30, 2015 3:06 AM