पिंपरी : शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेल्या पालक व इतरांनी शाळेच्या आयटी कन्सल्टंटला मारहाण करून त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुल येथे सोमवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
स्टॅफिन फ्रॅन्सिस चेरुवतुर (वय ४०, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रावसाहेब चंद्रकांत थोरात, गणेश सामल, शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांचे पालक, रावसाहेब थोरात याचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेरुवतुर हे त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुलचे आयटी कन्सल्टंट आहेत. या शाळेची फी न भरलेल्या काही विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी संबंधित पालकांनी केली होती. याबाबत संबंधित पालकांनी शिक्षणाधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता. दरम्यान, यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेच्या गेटमधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. आरोपींनी चेरुवतुर यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यातील एकाने घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करत त्यांची बदनामी केली.