पुणे : एकीकडे आशयघन मराठी चित्रपट जागतिक पातळीवर स्थान निर्माण करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांना चित्रपटगृहात पुरेसे शो न मिळण्याच्या अडचणीला आजही सामोरे जावे लागत आहे. ‘सिम्बा’ चित्रपटामुळे पुण्यामध्ये ‘भाई’ चित्रपटाला पुरेसे शो मिळण्यात अडचणी येत आहेत. थिएटर चालकांचा ‘भाई’ला पाठिंबा मिळत असला तरी वितरकांकडून त्यांच्यावर ‘सिम्बा’ चित्रपटाच्या शोसाठी दबाव आणला जात आहे. या दबावाबाबत थिएटर चालकांमध्येही मतभेद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांच्या जीवनप्रवासावर बेतलेल्या ‘भाई’ या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आज (४ जानेवारी) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र, ‘सिम्बा’ या चित्रपटामुळे जास्त शो मिळवण्यासाठी ‘भाई’ला झगडावे लागत आहे. ‘सिम्बा’चे जास्त शो लावण्यासाठी वितरकांकडून दबाव टाकला जात असल्याची प्रतिक्रिया एकीकडे थिएटरचालकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, केवळ प्रसिद्धीसाठी असे चित्र निर्माण केले जात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.वितरकांकडून ‘सिम्बा’साठी धमकीलक्ष्मी किबे थिएटरचे सुरेश किबे म्हणाले, ‘आमच्या थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला कायमच प्राधान्य देण्यात येते. ‘सिम्बा’चे तीन शो तुम्ही कमी करु शकत नाही, अशी धमकी वितरकांकडून देण्यात येत आहे. आम्ही ‘सिम्बा’चे तीन शो ठेवणार नाही, असे आम्हीही त्यांना ठामपणे सांगितले आहे. सगळे शो बंद केल्यास कोणालाच उत्पन्न मिळणार नाही.
‘सिम्बा’ हा केवळ मसाला चित्रपट असून प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता वितरकांची कोणतीही दादागिरी चालवून घेतली जाणार नाही. निर्माते वितरकांवर आणि वितरक थिएटर चालकांवर दबाव आणू पाहत आहेत. चित्रपट चालो अथवा न चालो, शो लावले की काही ना काही उत्पन्न मिळतेच, अशी वितरकांची आडमुठी भूमिका आहे. मात्र, आम्ही मराठी चित्रपटालाच प्राधान्य देणार असून, सध्या ‘भाई’ चित्रपटाचे दोन शो लावण्यात आले आहेत.’सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुदळे म्हणाले, ‘मराठी चित्रपटाला पहिल्याच दिवशी उठाव मिळत नाही. एक-दोन दिवसांनी प्रेक्षकांचा प्रतिसादवाढतो.हडपसर, खडकी अशा भागातील रसिकांचा ‘भाई’ चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे खडकीतील चित्रपटगृहात ‘भाई’चा शो सध्या तरी लावलेला नाही. मध्यवर्ती भागातील थिएटरमध्ये हा चित्रपट चांगले यश मिळवेल.’