पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावर दहा वर्षांनी चार दिवसांपासून ‘पीएमपी’ची बस धावत आहे. मात्र, ठिकठिकाणी महामेट्रोचे कामांचे अडथळे पार करताना अतिजलद सार्वजनिक वाहतुकीसाठीची ही सेवा मंदगतीने होत आहे. वॉर्डन असतानाही खासगी वाहनांची बीआरटी मार्गात घुसखोरी सुरू आहे. शिवाय बसगाड्या मार्गात बंद पडत असल्याने प्रवासाचा खोळंबा होत आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीसेवा सुरू करण्याचे दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. पालिकेने आयआयटी पवईच्या मदतीने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करून याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यानंतर न्यायालयाने बीआरटीएस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखविल्यानंतर बीआरटी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत बीआरटी लेनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने घुसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.बीआरटी मार्गावर इन आणि आऊट या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. मात्र, ते असतानाही मोठ्या प्रमाणावर लेनमधून दुचाकी, चारचाकी वाहने मार्गावर जात आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच ट्रॅफिक वॉर्डनवरही कारवाई झालेली नाही.बस पडताहेत बंदपुण्याहून निगडीकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेसमोरील कमला क्रॉसरोडसमोरील बीआरटी डेडिकेटेड लेनमध्ये सायंकाळी बस बंद पडली. अचानकपणे बस बंद पडल्याने पाठीमागून येणाºया बसगाड्यांचा खोळंबा झाला होता. प्रवाशांचेही हाल झाले. एकाच मार्गावर पाच ते आठ बस एकामागोमाग उभ्या होत्या. बराच काळ शेवाळवाडीची बस मार्गात अडकून पडली. कंडक्टरने बसमधील प्रवाशांना बसथांब्यावर उतरून दुसºया बसमध्ये बसवून दिले. बीआरटी मार्गात अडकलेल्या बसगाड्या काढण्यासाठीची यंत्रणा आली आणि मोरवाडी चौकातून ही बसगाडी बाहेर काढली.प्रशासनाचा दावा फोलया मार्गावर २७३ बस धावणार, तसेच एका दिवसाला २२०० फेºया आणि मिनिटाला एक फेरी होईल, असा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल ठरत आहे. बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, इतर वाहनांना बंदी आहे. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे, असेही प्रशासनाने सांगितले. मात्र, अजून कोणत्याही वाहनाला दंड केलेला नाही.प्रवाशांची उडतेय तारांबळबीआरटी मार्गावर प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. भोसरी-आळंदी ते चिंचवड, वाकड, हिंजवडी आणि पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, किवळे, रावेत परिसरात जाणाºया प्रवाशांची तारांबळ उडाली होती. डेडिकेटेड लेनमध्ये चिंचवड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रवासी नेहमीप्रमाणे बसथांब्यावर होते. नवीन बस थांबा माहीत नसल्याने कोणत्या बसथांब्यावर थांबायचे याबाबत गोंधळ उडत आहे. तर अंतर्गत प्रवास करणाºया नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे.