पिंपरी : दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाचे ‘सेफ्टी आॅडिट’ झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २४ आॅगस्टपासून दहा वर्षांपासून प्रलंबित असणारी बीआरटी सुरू करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी बीआरटी प्रकल्प राबविण्याचे नियोजन झाले. प्रमुख मार्गांवर बीआरटी सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी २००९ला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य वाहिनी असणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाचे नियोजन केले होते. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने या मार्गावर बीआरटी यशस्वी होणार नाही, असा दावा न्यायालयात दाखल झाला होता. तसेच अॅड़ हिंमतराव जाधव यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार पहिल्याच बीआरटी मार्गाचे नियोजन फसल्याने निगडी-दापोडी मार्ग रखडला होता. गेल्या नऊ वर्षांत अनेकदा या मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढला. मात्र, उद्घाटन झालेच नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेताच बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तसेच आयआयटी, पवईकडून सेफ्टी आॅडिट झाले. स्वयंचलित यंत्रणा, सुरक्षेच्या उपाययोजना, ग्रेड सेपरेटर, बीआरटी मार्ग आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असे एकात एक मार्ग असल्याने सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन केले आहे. या मार्गावरील बस टर्मिनल, थांबे यांचे कामही पूर्ण झाले आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, मर्ज इन आणि मर्ज आऊट येथे अपघात होणार नाहीत. क्रॉसिंग आणि चौकांच्या ठिकाणीही अपघात होणार नाही याचीही दक्षता घेतली होती.दापोडी-निगडी बीआरटी मार्ग शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन पूर्ण झाले आहे. पीएमपीने बसचे नियोजन केले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील बस टर्मिनसचेही उद्घाटन होणार आहे. बीआरटी मार्गावर सेवा सुरू करून दोन महिन्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे. सुरक्षाविषयक आणखी काही सूचना केल्यास त्याची उपाययोजना केली जाणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
‘बीआरटी’ला अखेर २४ आॅगस्टचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:12 AM