पिंपरी : निगडी ते दापोडी मार्गावर बीआरटी मार्गावर तब्बल चार वर्षांनी तरी बस धावणे अपेक्षित होते. मात्र, हा रेंगाळलेला प्रकल्प चर्चेचा मुद्दा होऊ नये, यासाठी दुचाकीचालकांसाठी हा मार्ग सोमवारपासून खुला करण्यात आला आहे. मात्र, दुचाकींनाही या मार्गावर अनेक अडथळ््यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरातील पाच मार्गांवर बीआरटी प्रकल्प राबविला. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यान सर्वांत आगोदर बीआरटी बससेवा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, हा साडेबारा किलोमीटर लांबीचा रस्ता करतानाच नियोजन फसले. औंध, रावेत आणि मुकाई चौक या मार्गावर बीआरटी बस धावू लागल्या. या मार्गावर मात्र बीआरटी बसऐवजी दुचाकींना मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून बीआरटीएस थांब्याकडे ये-जा करण्यासाठी सध्या पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच पालिकेसमोर रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी मार्गाचे काम केले जात आहे.(प्रतिनिधी)
बीआरटी मार्ग दुचाकीसाठी खुला
By admin | Published: March 21, 2017 5:22 AM