तळेगाव दाभाडे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर गंगाराम आवारे (वय ५०) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या प्राणघातक हल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव शहर हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव नगरपालिकेतून बाहेर पडले. मात्र मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात त्यांच्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला. या प्राणघातक हल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना रूग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालय बाहेर मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग एकवटला होता. किशोर आवरे यांच्या मृत्यूची वार्ता समजताच उपस्थितांनी मोठा आक्रोश केला. शिवविच्छेदनासाठी किशोर आवरे यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील शासकीय वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मागील काही काळा पासून सोमाटणे येथील अनधिकृत टोल नाक्याप्रश्नी आवारे यांनी मोठे जनआंदोलन छेडले होते. टोलनाका कायमचा बंद करण्यासाठी त्यांनी बेमदत उपोषणही केले होते. याची दखल राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांना टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. किशोर आवारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा तळेगाव शहरात निषेध केला जात आहे.