पिंपरी : दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण केला. चिंचवड येथील दवाबाजार येथे रविवारी (दि. २५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दवाबाजार येथील कुणाल प्लाझा सोसायटीच्या परिसरात हा प्रकार घडला.
सागर निल्लप्पा कांबळे (वय २२, रा.आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश निल्लप्पा कांबळे (वय २९, रा.सुदर्शननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सहदेव उर्फ सद्या सरवदे (रा.आनंदनगर, चिंचवड) याच्यासह अन्य एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सागर कांबळे याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे सागर हा गंभीर जखमी होऊन मोठा रक्तस्राव झाला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागर याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निगडी आणि पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये आरोपी ‘कैद’ झाले आहेत. त्यानुसार, यामध्ये दोघे जण सागर याच्याशी वाद घालताना दिसून आले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी सद्या सरवदे याचे नाव निष्पन्न केले.
मुलीची छेड काढल्याने केली होती मारहाण
एका मुलीला छेडल्याच्या कारणावरून मयत सागर कांबळे याचा एका तरुणाशी वाद झाला होता. त्यावेळी तरुणाने सागर कांबळे याला मारहाण केली होती. त्यावेळीही सागर जखमी झाला होता. मारहाणीच्या या घटनेनंतर आठवडाभरात सागर याच्या खुनाचा प्रकार घडला. त्यामुळे मारहाणीच्या घटनेचा खूनप्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सोसायटीत नाही सुरक्षारक्षक
सागर कांबळे याचा खून झालेल्या दवाबाजारामधील संबंधित सोसायटीत काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षक नियुक्त होता. मात्र, काही दिवसांपासून सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे सोसायटीत कोणीही सहज ये-जा करू शकते. अशाच पद्धतीने सागर कांबळे आणि आरोपी हे शनिवारी (दि. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंग परिसरात आले. त्यानंतर, त्यांच्यात वाद सुरू झाला. मात्र, ही बाब सोसायटीतील एकाही रहिवाशाच्या निदर्शनास आली नाही, तसेच सागर आणि आरोपी यांच्या वाद सुरू असल्याबाबतही सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना कळविले नाही. वादात आरोपींनी सागर याचा खून केला.