पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) सादर होणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेमध्ये प्रशासक आहे. त्यामुळे हा प्रशासकांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेचा ४१ वा, तसेच आयुक्त शेखर सिंह यांचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत तयार केलेल्या या अर्थसंकल्पातून शहरवासीयांना काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पासाठी १४ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त शेखर सिंह हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, गतवर्षी महापालिकेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे एकूण ४९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये यंदा वाढ होणार की घट होणार, तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना नवीन काय मिळणार याबाबत उत्सुकता आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पावर तत्कालीन सत्ताधारी भाजपची छाप होती. मात्र, आता नगरसेवकांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासक आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने संपूर्णत: प्रशासकांची छाप अर्थसंकल्पावर असणार आहे. त्यामधून शहरवासीयांना काय मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
मोठे प्रकल्प मिळणार का?
सलग दोन वर्षे कोविडचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकावरही त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे शहरामध्ये सलग दोन वर्षे एकाही मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली नव्हती. सलग दोन वर्षे सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे गतवर्षीच्या अंदाजपत्रकामध्येदेखील नवीन कामांना ब्रेक देण्यात आला होता. तर जे जुने प्रकल्प आहेत त्यांनाही निधीची कमतरता पडण्याची शक्यता होती. यंदा उत्पन्नात वाढ झाली असली तरी शहरातील जुने प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदाही शहराला अंदाजपत्रकातून मोठे प्रकल्प मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
''मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आयुक्त आपला अर्थसंकल्प मांडणार आहेत. - जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखाधिकारी.''