पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका आवारात उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाची आहे. आम्ही चुकीच्या गोष्टीचे कधीही समर्थन करणार नाही. आम्ही आपल्यासोबत आहोत. नितीन बोऱ्हाडे यांच्या कृत्याबद्दल जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी समाजाची माफी मागतो. उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपूत्र यांच्यात वाद होणार नाही. हातात हात घालून शहराचा विकास करू, असे आवाहन भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले.
भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी जमीन व्यवहारातील वादातून उद्योजक नरेश पटेल यांना महापालिका आवारातच मारहाण केली होती. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पटेल समाजाने थेट आमदार लांडगे यांना साकडे घातले.
वादाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील पटेल समाजाने आमदार लांडगे यांची भेट घेतली. भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर नवरात्रोत्सव सुरू आहे. तेथे महाआरतीनंतर पटेल समाजाच्या समूहाने लांडगे यांच्यासोबत या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. शहरात आम्ही तुमच्या भरवश्यावर व्यवसाय करीत आहोत. त्यामुळे या प्रकरणावर तोडगा काढावा, असे साकडे पटेल बांधवांनी आ. लांडगे यांना घातले. सुमारे दीड हजार समाजबांधवांसमोर आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली. तसेच, चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, दोन-तीन दिवसांत एकत्र बैठक घेत सामोपचाराने वाद मिटवू, अशी ग्वाही दिली.