पिंपरी : चक्रवाढ व्याज आकारून बांधकाम व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तीन फ्लॅट बळजबरीने नावावर करून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. चिंचवड येथे २०१५ पासून हा प्रकार सुरू होता.
दीपक वाल्मीक सूर्यवंशी (रा. बिजलीनगर, चिंचवड), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका बांधकाम व्यावसायिकाला २०१५ मध्ये बांधकाम व्यवसायासाठी दरमहा दरशेकडा १० टक्के व्याजदराने सहा लाख रुपये दिले होते. ते ठरल्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकाने व्याजाचे पैसे परत न केल्याने आरोपीने वारंवार फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातपाय तोडण्याची धमकी देऊन व्याज व चक्रवाढ व्याज असे एकूण २७ लाख ६० हजार रुपये वसूल केले. तसेच बांधकाम व्यावसायिक व त्याच्या वडिलांच्या नावे असलेले तीन फ्लॅट आरोपीने कागदपत्रे तयार करून बळजबरीने नावावर करून घेतले. तसेच पुन्हा २० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. त्यावरून तपास करून चिंचवड पोलीस ठाण्यात ८ आक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. सराईत गुन्हेगार असलेल्या दीपक सूर्यवंशी याच्या विरोधात यापूर्वी खूनप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलीस कर्मचारी कल्याण महानोर, सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अवैध सावकारी करणारे पोलिसांच्या ‘रडार’वर
सावकारीचा अवैध धंदा करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. कर्जदारास वेठीस धरून व्याज, चक्रवाढ व्याज वसूल करणे, कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे, बळाचा वापर करणे, सावकारी लायसन्स व्यतिरिक्त अन्य रितीने सावकारीचा धंदा करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.