पिंपळे गुरव : पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यावर दापोडी हे ५० मीटर लांबीचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकाचा भव्य सुसज्ज परिसर आहे. मात्र, प्रवाशांसाठी मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे प्रवासी हैराण आहेत. यामध्ये बंद असलेली स्वच्छतागृहे, पाणी, कॅन्टीन, डस्टबिन, मोकाट जनावरांचा त्रास आदी समस्यांमुळे प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते आहे.या रेल्वे स्टेशनभोवती बोपखेल, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव हा मोठा परिसर आहे. त्यामुळे नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक हे रेल्वेनेच प्रवास करतात. प्रवाशांचे सोयी-सुविधांसाठी मोठे हाल होत आहेत. शेजारीच दापोडी-सांगवीचा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता बंद असतानाही अनेक नागरिक रस्ता ओलांडताना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. या स्टेशनवर महिला व पुरुष स्वच्छतागृह आहे. मात्र दोन्ही स्वच्छतागृहांना कुलूप लावले आहे. त्यामुळे महिला व पुरुषांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रवास करून आलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. हजारो प्रवाशांसाठी फक्त एकाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सर्व ठिकाणे बंद असून, धूळखात पडलेली आहेत. त्यामुळे त्या वॉशबेसिनचा थुंकीसाठी उपयोग होत आहे. प्लॅटफॉर्मवर फक्त एकच कचराकुंडी आहे. त्यामुळे अस्ताव्यस्त कचरा पसरलेला दिसतो. (वार्ताहर)
इमारत मोठी; पण सुविधा तोकड्याच
By admin | Published: January 14, 2017 2:48 AM